चिंचवड : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील दगडोबा चौक, बिजलीनगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील कचरा व अस्वच्छता हटवून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान रस्त्यालगतचा कचरा तसेच सार्वजनिक परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. त्यामुळे दगडोबा चौक परिसर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यात आला.
यावेळी पल्लवीताई वाल्हेकर व आशाताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ओला व सुका कचरा योग्य पद्धतीने वर्गीकरण करून तो महानगरपालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरिक व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ हा संदेश देण्यात आला. नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या मोहिमेत सहाय्यक आरोग्य अधिकारी भूषण शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य निरीक्षक खंडेराव बैलकवाड, आरोग्य सहाय्यक सागर सणस, आरोग्य मुकादम हनुमंत माने, नवनाथ मोहोळ, सागर देवनोळ, डिवाईन झोनल कुलदीप लोंढे, प्रियांक सुपरवायझर आकाश नागटिळक, वॉर्ड इन्चार्ज अमोल वाघमारे यांच्यासह पालिका कर्मचारी, प्रियांक कर्मचारी व डिवाईन कर्मचारी सहभागी झाले.
