मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. लाखो प्रवासी दररोज मुंबई लोकलने प्रवास करतात. पण प्रवास करत असताना लोकल ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करु नये, असं नेहमी आवाहन केलं जातं.

पण तरिही काही जणांकडून लोकल ट्रेनला लटकून जीवघेणा प्रवास केला जातो. अशाप्रकारे प्रवास करणं नालासोपाऱ्याच्या दोन मित्रांना जीवावर बेतलं आहे. लोकल ट्रेनमधून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नालासोपाराहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, कायम भेडसावणाऱ्या धोक्याची जाणीव करून देणारी भीषण घटना नालासोपारा-वसईदरम्यान घडली आहे. लोकलमधून पडल्याने दोन तरुणांना जीवघेणे पडसाद भोगावे लागले. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत उपचाराधीन आहे.

प्रतीश बाळाराम बोले (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नानासाहेब बंधने (वय 32) हा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. नोकरीनिमित्त नालासोपाऱ्यात वास्तव्यास असलेला प्रतीश बोले हा घटनेच्या दिवशी विरार रिटर्न ट्रेन पकडण्यासाठी नालासोपारा-चर्चगेट लोकलमध्ये चढला. मात्र प्रचंड गर्दीमध्ये दरवाजात लटकून उभे असताना त्याचा हात सुटला आणि तो वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या नानासाहेब बंधनेलाही गंभीर दुखापत झाली.

प्रतीश बोले हा बांद्रा येथील ‘किरण एक्स्पोर्ट’ या डायमंड कंपनीत कार्यरत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी राहून काम करणाऱ्या या तरुणाचा मृत्यू मोठा आघात ठरला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे घटना घडणारी ही पहिली घटना नाही. याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यावर आता प्रशासन काय उपाययोजना करणार? ते पाहणं महत्त्वाच आहे.

दरम्यान, नालासोपारा-वसई मार्गावर दररोज प्रचंड गर्दी असल्यामुळे दरवाजात लटकून प्रवास करण्याची प्रवाशांची बाध्यता वाढली आहे. वाढत्या प्रवासीभाराचा विचार करून लोकल ट्रेनची संख्या वाढवावी आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version