|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

चिंचवडे नगर : दगडोबा चौक, चिंचवडे नगर परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या भागात आतापर्यंत चार वेळा वाहनांचे नुकसान झाले असून, आज पुन्हा काही गाड्यांची अज्ञात miscreants कडून तोडफोड करण्यात आली आहे. या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.

तोडफोडीत टुरिस्ट गाड्या, पिकअप, रिक्षा तसेच खासगी वाहनांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. टुरिस्ट गाड्या कंपनीकडून ड्रायव्हर्सकडे राहण्यासाठी दिल्या जात असल्याने त्यांच्या पार्किंगवेळी रात्रीच्या वेळेत ही तोडफोड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या भागात वारंवार घडणाऱ्या घटनांनी पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पोलिसांची गस्त वाढवावी, नाहीतर अशा घटना थांबणार नाहीत,” अशी नागरिकांची ठाम मागणी समोर येत आहे.

घटनांनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. “आरोपी पकडले तर त्यांची धिंड काढली जावी किंवा त्यांना आमच्या ताब्यात द्यावे; जसे त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या तसे आम्ही त्यांची तोडफोड करू,” अशा संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून तपास जलदगतीने सुरू असल्याची माहिती चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली. “लवकरच आरोपींचा शोध लागेल आणि कठोर कारवाई केली जाईल,” अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version