शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत आणि पिंपरखेड परिसरात बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून, गेल्या पंधरवड्यातील बिबट्याच्या हल्ल्यांत तिसरा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या वाहनाला आग लावून निषेध नोंदविला होता.
अजूनही आंदोलन आणि रास्ता रोकोची परिस्थिती शांत झालेली नसतानाच सोमवारी (दि. ३) शिरूर तालुक्यातील जांबूत परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या. पालकांनी बिबट्याच्या भीतीमुळे मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून शिक्षक मात्र शाळेत हजर राहिले.
ही बाब अधिक धक्कादायक ठरते कारण शिक्षण विभागालाही या नऊ शाळा बंद असल्याची माहिती नव्हती. शिरूर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना याची कल्पना नसल्याचे समोर आले आहे.
टाकळी बेटातील जांबूत परिसरात काही दिवसांपूर्वी पाच वर्षांच्या शिवन्या बोंबे या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. त्यानंतर पिंपरखेड येथील रोहन बोंबे या बालकाचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सलग दोन बालकांच्या मृत्यूमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण अधिक गडद झालं आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पिंपरखेड, कोयमहालेवस्ती, ढोमेमळा, दाभाडेमळा, गाजरेझाप, चांडोह, माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, जांबूत, चांडोह आणि वडनेर खुर्द या नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या. दिवसभर एकही विद्यार्थी शाळेत आला नाही.
दरम्यान, या भीतीमुळे शाळा बंद ठेवण्याचे लोण खेड, जुन्नर, पुरंदर आणि दौंड तालुक्यांमध्येही पसरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात शिक्षण विस्तार अधिकारी के. बी. खोडदे म्हणाले, “बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नाहीत. शिक्षक मात्र नियमानुसार शाळेत हजर होते. या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.”
