|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी-चिंचवड :  चिंचवडमध्ये घडलेल्या नकुल आनंदा भोईर हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी नव्या आरोपीला अटक केली आहे. मयताच्या पत्नीचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार याचा या खुनात सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

घटनेचा तपशील असा की, दि. २४ ऑक्टोबर रोजी फिर्यादी तुषार आनंदा भोईर (वय ४३, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ नकुल आनंदा भोईर (वय ४०) याची पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८) हिने वारंवार दारू पिणे, इतर पुरुषांसोबत फिरणे आणि कर्ज काढणे यावरून होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर रागातून त्याचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चैताली भोईरला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासले असता, अटक महिला आरोपी चैताली भोईर हिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानुसार, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चकित करणारे तपशील समोर आले.

तपासात उघड झाले की, चैताली आणि सिद्धार्थ यांच्यात प्रेमसंबंध होते. नकुल भोईर हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा खून करण्याचे ठरवले. दि. २३ ऑक्टोबर रोजी चैतालीच्या जुन्या कर्जाविषयी वाद झाल्याने नकुलने तिच्यावर मारहाण केली. त्या वेळी सिद्धार्थ उपस्थित होता आणि रागाच्या भरात दोघांनी संगणमताने ओढणीच्या साहाय्याने नकुलचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सिद्धार्थ दिपक पवार याला दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल करंबळकर करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version