|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

चिंचवड : चिंचवड परिसरातील नागसेननगर झोपडपट्टीत जुन्या वादातून २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार (दि.२२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. वैभव भागवत थोरात (वय २५) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव थोरात हा आपल्या खोलीत इतर चार जणांसोबत बसला असताना आरोपी अचानक आत शिरले. आरोपींमध्ये योगेश अनंत गायकवाड, अनिल आनंद बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींपैकी योगेश गायकवाड आणि वैभव यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. त्याच रागातून आरोपींनी वैभववर अचानक कोयत्याने हल्ला चढवला.

हल्ल्यात वैभवच्या हातावर, छातीवर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आले. गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. नागरिकांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ हालचाल करून चारही आरोपींना अटक केली. अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे चिंचवड परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. किरकोळ कारणांवरून किंवा जुन्या वादातून गुन्हेगारांकडून जीवघेणे हल्ले होत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version