प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे

पंढरपूर : पंढरपूर शहर खड्ड्यांचे साम्राज्य बनले असून नागरिकांचा संताप दिवसेंदिवस उफाळून येत आहे. भीमा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरच गुडघाभर खड्डे पडल्याने वाहतुकीसह अपघातांचा धोका वाढला आहे. शहराची अवस्था इतकी दयनीय आहे की पंढरपूर आहे की “खड्डेपूर” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

नगरपालिका कुंभकर्णी झोप काढत असून आजी-माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांना फक्त निवडणूक आली कीच पंढरपूरची आठवण होते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. शहरातील गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य, रस्त्यांवर मोकाट जनावरे, डुकरे, कुत्री व तुंबलेली गटारे यामुळे भाविक आणि नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

 

विशेष म्हणजे, सरगम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोसले चौक, स्टेशन रोड, जुनी पेठ यासह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. एखाद्या संत्री-मंत्र्यांचा दौरा झाला कीच खड्डे बुजवले जातात; अन्यथा प्रशासन व लोकप्रतिनिधी डोळेझाक करतात, असा आरोप नागरिक करत आहेत.

नागरिकांची प्रतिक्रिया

“रस्त्यांवर पाय ठेवण्याचीही भीती वाटते. अपघात, आजारपण आणि वाहतुकीची झगडणं यातून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा पंढरपूरकरांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version