|| प्रतिनिधी : संजय वाईकर ||

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शुक्रवार (दि. ५) रात्री नाना पेठेतील नवरंग मित्र मंडळाजवळ झालेल्या भीषण हल्ल्यात गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर (रा. नाना पेठ) याचा निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी प्रथम पिस्तूलातून सलग तीन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याला जागीच ठार मारले.

गोविंदचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठीच गोविंदला लक्ष्य केले, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे टोळीने याआधी आंबेगाव पठार परिसरात रेकी केली होती. या भागात वनराज आंदेकर हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह तेरा जणांची घरे आहेत. मात्र रेकी एका भागात करून प्रत्यक्ष हल्ला नाना पेठेत घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे (रा. गणेश पेठ) याच्याकडून या धक्कादायक कटाची माहिती मिळवली आहे.

 

या हत्येचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे, हल्ल्यावेळी परिसरात डीजेवर “टपका रे टपका, एक और टपका, तीन में से एक गया दो ये मटका” हे गाणं वाजवण्यात आल्याचे समोर आले आहे. गाण्यावर हत्या केल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रकार शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशीच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने नाना पेठ परिसरात दहशत पसरली आहे. ऐन उत्सवाच्या काळात अशा प्रकारचा हल्ला घडल्यामुळे पोलिस बंदोबस्त आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीत धुमसत असलेला रोष अजूनही कायम असल्याचे या घटनेतून दिसून आले असून, पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवॉरचे सावट गडद झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version