|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : गुन्हे शाखा, युनिट-४ पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाडसी कारवाई करत बाबा शेख गॅगचा सदस्य, मोक्का जेल रिलिज व तडीपार आरोपी पवन देवेंद्र बनेटी (वय २४, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी १३ ऑगस्टपासून ‘अवैध अग्नीशस्त्र विरोधी ड्राईव्ह’ सुरू करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखांना दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तडीपार आरोपी पवन बनेटी पिंपळे निलख परिसरात शस्त्रसाठ्यासह येणार आहे. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

आरोपी पवन बनेटी हा मोक्का अंतर्गत जेल रिलिज असून, त्याच्यावर खुनासह गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यातून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम लावण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवळे, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि भरत गोसावी, पोउपनि मयुरेश साळुंखे, सपोउपनि संजय गवारे, प्रविण दळे, नितीन ढोरजे, पोहवा कृणाल शिंदे, पोहवा सुरेश जायभाये, पोहवा तुषार शेटे, पोहवा मोहम्मद गौस नदाफ, पोहवा माऊसाहेब राठोड, पोशि प्रशांत सैद, पोशि गोविंद चव्हाण, पोशि सुखदेव गावंडे, पोशि अगर राणे, पोशि दिनकर आडे, पोशि रवि पवार व पोशि धनंजय जाधव या सर्वांनी सहभाग नोंदवून धाडसी कारवाई केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version