|| पंढरपूर प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : पंढरपूर शहरातील शिंदे-नाईक नगर, कुंभार गल्ली येथे दिनांक १७ जुलै रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला आज ४५ दिवस उलटून गेले आहेत. माय–लेकरांचा निर्घृण खून होऊनही आरोपींचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तपास ठप्प असल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुका हादरलेला असून पोलिस यंत्रणेवर संशयाची छाया आहे.
या हत्याकांडातील जगताप कुटुंब आजही भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहे. “आमच्यावरही लपून-छपून हल्ला होईल, अशी भीती कायम आहे. पोलिसांकडे चौकशीसाठी गेल्यावर फक्त ‘तपास सुरू आहे’ अशीच उडवाउडवीची उत्तरे मिळतात,” अशी तक्रार संजय जगताप यांनी व्यक्त केली. तसेच, “न्याय हवा असेल तर या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, स्थानिक पोलिसांची उदासीन भूमिका नागरिकांना खटकत आहे. ४५ दिवसांत आरोपी न सापडणे ही गंभीर बाब असून नागरिक विचारत आहेत की, “अशा गंभीर प्रकरणाकडे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देणार की नाही?”
सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “पोलिस यंत्रणा या प्रकरणात पारदर्शकतेने काम करत नसल्याचा संशय निर्माण होत आहे. आरोपींचा शोध लागला नाही तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास कोसळेल.”
सध्या संपूर्ण तालुका या प्रकरणाच्या निष्कर्षाकडे डोळे लावून बसला आहे. जगताप कुटुंबियांना न्याय मिळतो की त्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
