|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : मागील काही महिन्यांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. पोलिसांच्या कमालीच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगार पुन्हा डोके वर काढत असून नागरिक भयभीत झाले आहेत. कुणाचे हाणामाऱ्यांचे आरोपी मोकाट फिरत आहेत, तर शहरातील ट्रॅफिक जाम, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
कुंभार गल्लीतील आई-मुलाच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणातील आरोपी आजतागायत हाती लागले नाहीत. विजेच्या प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, मात्र अद्याप संबंधितांवर कारवाई झालेली नाही. दरम्यान, खुनातील आरोपीस जामीन मिळाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात जल्लोष केला. शहरातील मिरवणुकांमध्ये आरोपींचे फोटो झळकवले जात आहेत.
इस बावी येथील एका घराला लावण्यात आलेल्या आगीत तिघेजण भाजले, पण आरोपींचा शोध अद्याप लागलेला नाही. ग्रामीण भागात अवैध वाळू, दारू, गुटखा विक्री जोमात सुरू असून याचातून खुनी हल्ले, चोऱ्या-माऱ्या घडत आहेत. “याकडे पोलिसांचे लक्ष कधी जाणार?” असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर हे केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर दररोज दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सुरक्षित राहणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली होती, मात्र अलीकडे पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
गल्लोगल्लीतील हाणामाऱ्या, मुलींना पोस्ट लावून पळवणे, चोऱ्या-लुटमारी, शक्तिप्रदर्शन यामुळे नागरिक दहशतीत आहेत. राजकीय नेत्यांच्या सोबत गुन्हेगारांचे फोटो झळकत आहेत, तर मिरवणुकांमध्ये त्यांचा सन्मान होत आहे. खून-हल्ल्यांचे आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसून “तपास सुरू आहे” एवढेच सांगून प्रकरणावर पांघरूण घातले जात आहे.
लवकरच गणेशोत्सव, नवरात्र तसेच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर येत आहेत. या काळात पंढरपूर तालुका व शहर पोलिस यंत्रणा कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात कितपत यशस्वी ठरणार, याविषयी नागरिकांच्या मनात प्रचंड प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
