गडचिरोली, चामोर्शी (प्रतिनिधी : प्रशांत शाहा)  रक्षाबंधन म्हणजे केवळ घरातील भावाला राखी बांधण्यापुरते मर्यादित नाही, तर हृदयाने जोडलेले नातेही तितकेच महत्त्वाचे असते, याचा सुंदर प्रत्यय चामोर्शी तालुक्यातील वाकडी गावातील आदितीने दिला आहे. बारावीची विद्यार्थिनी असलेली आदिती दररोज चामोर्शी येथे शिक्षणासाठी एसटी बसने प्रवास करते. शाळेत जाताना तिची सुरक्षितता, वेळेवर पोहोच आणि प्रेमळ काळजी घेणाऱ्या बस चालक व वाहकाला ती आपले “मोठे भाऊ” मानते.

या रक्षाबंधनाच्या दिवशी आदितीने नेहमीप्रमाणे शाळेकडे जाणाऱ्या प्रवासातच, एसटी बसमध्ये उभे राहून चालक व वाहक यांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. हसऱ्या चेहऱ्याने दिलेली ती राखी आणि त्यासोबतचा भावनिक क्षण पाहून बसमधील सर्व प्रवासी भारावून गेले.

हा उपक्रम केवळ तिच्या भावनेचा सन्मान नसून समाजात नाती रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन कशी जुळू शकतात याचेही सुंदर उदाहरण आहे. आदितीच्या या अनोख्या रक्षाबंधनाची सध्या सर्वत्र चर्चा आहे, आणि गावापासून सोशल मीडियापर्यंत तिच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

रक्षाबंधनाच्या पवित्र धाग्याने बांधलेला हा ‘रस्त्यावरचा’ सोहळा खऱ्या अर्थाने नात्यांच्या मर्यादा मोडून एक नवा संदेश देऊन गेला – नाती ही मनाची असतात, रक्ताची असणं गरजेचं नसतं.

Share.
Leave A Reply

Exit mobile version