चिंचवड : सकाळी शाळेच्या प्रांगणात देशभक्तीच्या गीतांचा नाद घुमत होता… तिरंगा फडकत होता… आणि प्रत्येक चेहऱ्यावर देशप्रेमाचा तेजोमय उत्साह झळकत होता. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड येथे आज (शुक्रवार) क्रांती दिनाच्या औचित्याने क्रांती सप्ताहाचा समारोप भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी राजेंद्रकुमारजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमारजी कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश दिला. उपविख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक करत आठवडाभर चाललेल्या क्रांती सप्ताहातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत रंगून त्यांचा संघर्ष, त्याग आणि शौर्य अभिनयातून साकारले. भाषण स्पर्धेत ओम परदेशी (इ. ५ वी), अर्णव खाडे (इ. ८ वी) व चेतन जाधव (इ. १० वी) यांनी जोशपूर्ण शब्दांत देशभक्तीचे महत्त्व सांगत, स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे शब्द ऐकून उपस्थितांमध्ये अभिमानाची लहर पसरली.
पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व स्पष्ट करून भावबंधन आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या सुनीता नवले यांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान स्मरून, आजच्या पिढीपुढील नवनवीन आव्हानांचा उल्लेख केला. “स्वातंत्र्य केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, न्याय, समता आणि प्रगतीसाठी सातत्याने लढा देणे हीच खरी नवी क्रांती आहे,” असे त्या म्हणाल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली ललवाणी यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा कलशेट्टी यांनी केले. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली. शेवटी देशभक्तीच्या घोषणांनी व गगनभेदी जयघोषांनी विद्यालय परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली.
