पंढरपूर : ( प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ): पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे गर्दी करतात. मात्र, हेच मंदिर सध्या पान, तंबाखू, गुटखा खालून थुंकणाऱ्यांच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे अपवित्र होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी स्वतः पाहिला असून, त्यांनी या घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रांसह सोशल मीडियावर सार्वजनिक पर्दाफाश केला आहे. त्यांनी मंदिर प्रशासन, समिती आणि जिल्हा यंत्रणेवर गंभीर आरोप करत तातडीने चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे.

❝ पावित्र्याला गालबोट लावणारे हे प्रकार असह्य! ❞

गणेश अंकुशराव हे नुकतेच दर्शनासाठी श्रीविठ्ठल मंदिरात गेले असताना, श्री रूक्मिणी मातेच्या मूर्तीसमोरील दरवाजाजवळ काही व्यक्ती धुम्रपान करत थुंकताना त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून ते अवाक झाले. देवाच्या मंदिरात अशा अशुद्ध व घाणेरड्या वर्तनाने श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

❝ मंदिर प्रशासन काय करतंय? कुठे आहे लाखोंचा स्वच्छता ठेका? ❞

“दहा लाखांच्या स्वच्छतेच्या ठेक्याचे नेमकं काय चाललंय? मंदिर परिसरात इतक्या खुलेआम थुंकी व घाण करणं हे दुर्लक्ष की निष्काळजीपणाचा परिणाम आहे?” असा खडा सवाल अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.

इतकंच नव्हे, तर “या प्रकारामागे मंदिर समितीतीलच काही कर्मचारी असण्याची शंका आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. यामुळे संपूर्ण समिती व प्रशासनाची जबाबदारी ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

❝ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे! ❞

“हा प्रकार कोणताही भाविक सहन करणार नाही. मंदिर म्हणजे केवळ धर्मस्थळ नव्हे, तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करतो,” असे अंकुशराव यांनी स्पष्टपणे सांगितले.

 वारकरी आणि भाविकांतून संताप

या प्रकारानंतर वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, मंदिराच्या पावित्र्याशी खेळणाऱ्यांना दंडनीय शिक्षेची मागणी केली आहे.

विशेष उल्लेख :
गणेश अंकुशराव यांनी सादर केलेले व्हिडिओ व फोटो प्रशासनाने तातडीने संज्ञानात घ्यावेत, अशी वारकरी भाविकांचीही मागणी आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version