पंढरपूर : प्रतिनिधी ( ज्योतिराम कांबळे ) तीर्थक्षेत्र पंढरपूरात दरवर्षी राज्यभरातून तसेच परराज्यातून लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात. येथील धार्मिक परंपरेनुसार अनेक भाविक प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करतात. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुर्दैवी घटना घडत असून भाविकांचे जीव गमावण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदी पात्रात प्रशिक्षित व अनुभवी कायमस्वरूपी जीवनरक्षक (लाईफ गार्ड) नेमण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा उपाययोजनेमुळे भाविकांचा जीवितधोक्याचा प्रश्न सुटेल व भविष्यातील संभाव्य दुर्घटनांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना या जीवनरक्षकांची नेमणूक नियमित करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आता भाविक, स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून व्यक्त होत आहे.

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version