📍 पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : ( अमोल बेडके ) पोलिस दलावर नागरिकांचा विश्वास असतो, मात्र पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रावेत पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी हा विश्वास तुडवून लाजीरवाणं कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका गुन्ह्याच्या तपासात आरोपीस मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या महिला पोलीस हवालदार आणि सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे राजश्री घोडे (महिला पोलीस हवालदार) आणि राकेश पालांडे (सहायक फौजदार) अशी आहेत. तक्रारदार हे वकिली व्यवसाय करणारे असून त्यांच्या आशिलावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राजश्री घोडे करत होत्या. आरोपीस अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्रात मुद्दाम त्रुटी ठेवून मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
सदर लाच मागणीमुळे तक्रारदाराने १७ जुलै २०२५ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) येथे तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाल्यानंतर त्या दिवशीच पंचासमक्ष व्यवहाराची चाचणी करण्यात आली. त्यात घोडे यांनी तडजोड करत ३० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तपासात हेही निष्पन्न झाले की सहाय्यक फौजदार राकेश पालांडे यांनीही लाच मागणीस प्रोत्साहन दिले होते.
यानुसार, १८ जुलै २०२५ रोजी ACB ने सापळा रचला. रावेत पोलीस ठाण्यात राजश्री घोडे यांना पंचासमक्ष तक्रारदाराकडून ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, तर राकेश पालांडे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. या घटनेमुळे पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्तींविरोधात एसीबीने पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे
