पिंपरी ( प्रतिनिधी : प्रभू कांगणे ) : गुन्हे शाखा, युनिट-५ पिंपरी चिंचवड यांनी अवघ्या आठ दिवसांत घरफोडी प्रकरणातील चार अट्टल चोरांना अटक करत तब्बल २५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील गु. रजि. नं. १९०/२०२५, भादंवि कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि श्रीधर भोसले आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पुढे नेत अल्टो कार (MH 12 CD 2165) चा शोध घेतला.
त्यानंतर साईनगर, वनविभागाच्या जंगलात सापळा रचून आरोपी यशोदास विजय राठोड (वय २७), रितेश करणसिंग राठोड (वय २७), आकाश रवि मैनावत (वय २९), ऋतिक रवि मैनावत (वय २१) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या एका फरार साथीदार अभिषेक नानावत यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून ३५.६ तोळे सोनं आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्रीधर भोसले करत आहेत.
या उल्लेखनीय कारवाईसाठी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांनी कौतुकाची थाप दिली आहे.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली सहा. पो.नि. श्रीधर भोसले, पोहवा पवार, माने, सुर्यवंशी, पोना गोनटे, शेख, पोना सोडगिर, पोशि खेडकर, गाडेकर, इघारे, गुट्टे, मुंडे, सोनवणे, ब्रह्मांदे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एकत्रितपणे पार पाडली आहे.
