लातूर : रस्त्यावर ट्रिपल सीटने प्रवास करणाऱ्या तीन तरुणींना ‘झिपरे’ असे म्हणत शिवीगाळ करून कानफटात मारणं एका महिला ट्रॅफिक पोलिसावर महागात आलं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणींनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत महिला पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ही घटना लातूर शहरातील असून, आरोपी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रणिता मुसने या ड्युटीवर जात असताना त्यांनी स्कुटीवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन तरुणींना रस्त्यात थांबवत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व एका मुलीला कानफटात मारली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका नागरीकाने शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता तो व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले.
तक्रारीनंतर कॉन्स्टेबल मुसने यांनी स्वतःहून स्पष्टीकरण देत व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून माफी मागितली. “मी एका आईसारखा राग व्यक्त केला. भावनेच्या भरात घडलेला प्रकार होता. मला ड्युटीवर जायचे होते आणि वर्दी घातली होती. मी कोणालाही मुद्दाम मारहाण केली नाही,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या घटनेवरून नेटकऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले. काहींनी तरुणींनी नियम तोडल्याने पोलीस कारवाई झाली, असे म्हणत मुसने यांना पाठिंबा दिला. तर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी पोलीस कर्मचारी महिलांवर अश्लील भाषेत बोलणे आणि मारहाण करणे हे पूर्णपणे चुकीचे असून, अशा कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असून संबंधित महिला कॉन्स्टेबलविरोधात वरिष्ठ पातळीवरून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
