|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातील शांतिबन सोसायटीत गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. पूर्वी सोसायटीत हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या व्यक्तीने सोसायटीच्या मुख्य गेटवर ड्युटीवर असलेल्या वॉचमनवर चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने सिमेंटचा गट्टू देखील वॉचमनच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २० जून २०२५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शांतिबन सोसायटी, चिंचवडगाव, पुणे येथे घडली. या प्रकरणी सुदाम नारायण कामिटे (वय ५६ वर्षे, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड, रा. जय गणेश कॉलनी, चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून राम देवराम लोंढे (वय ४० वर्षे, रा. श्रीकृष्ण कॉलनी, लेन नं. ३, स्वामी समर्थ मंदिराजवळ, थेरगाव फाटा) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कामिटे व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शांतिबन सोसायटीच्या गेटवर रात्रपाळीवर होते. त्याच दरम्यान आरोपी राम लोंढे हा सोसायटीच्या गेटवर आला आणि “मला सोसायटीच्या सेक्रेटरी व चेअरमन यांना भेटायचं आहे, मला आत सोडा” अशी मागणी करू लागला. परंतु तो याआधीही वादग्रस्त होता आणि सोसायटीत असंतोष निर्माण केला होता, यामुळे कामिटे यांनी त्याला आत सोडण्यास नकार दिला.
यामुळे चिडून राम लोंढे याने कामिटे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कामिटे यांनी त्याला संयम राखण्यास सांगितले असता, अचानक रामने खिशातून चाकू काढून कामिटे यांच्या पोटावर दोन वेळा वार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने तिथेच असलेल्या सिमेंटच्या गट्टूने कामिटे यांच्या डोक्यावर जोरात मारले. या हल्ल्यात कामिटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ११८(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करंबळकर हे करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीतील सदस्यांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.
