पुणे : गंगाधाम चौकात गतवर्षी ट्रकने दोन महिलांना चिरडले होते. त्यात एका महिलेचा बळी गेला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एका महिलेचा बळी गेला. या चौकातील अशा जीवघेण्या दुर्घटनांना नेमके कोण जबाबदार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या वर्षी दुर्घटनेनंतर नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून अवजड वाहनांवरील बंदीची अंमलबजावणी करून वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले होते. यानंतरही महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे महिलेच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? असा जाब नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे.

या चौकात उतारावरून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वारंवार अपघात होतात. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या चौकातील वाहतूक व्यवस्थेचा वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाला समन्वयाने फेरविचार करावा लागेल. याशिवाय शहरातील सर्व धोकादायक चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी करा

गंगाधाम- मार्केट यार्ड रस्त्यावर अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे. परंतु वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. सूचना फलकही जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. जनतेच्या हिताचे काम करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नेमावेत. धोकादायक वाहतुकीचा प्रश्न सोडवावा. या भागातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विविध पक्ष आणि संघटनांनी केली आहे.

या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. येथील रस्त्यावर दिवसा अवजड वाहने येण्यास बंदी असूनही वाहने सर्रासपणे येतात. त्याकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. ट्रक, मिक्सर, खडी, क्रशसँड, सिमेंट व स्टीलचे ट्रक, डंपर येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पोलिसांवर प्रश्‍नांच्या फैरी

वाहतूक पोलिसांनी वर्दळीच्या वेळी शहरात अवजड वाहनांना बंदी केली आहे. यानंतरही मार्केट यार्ड परिसरात आणि प्रामुख्याने गंगाधाम चौकात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे हा ट्रक सकाळी गंगाधाम चौकात कसा आला? त्यावेळी परिसरातील वाहतूक पोलिस नेमके काय करीत होते? पोलिसांकडून अवजड वाहनांवर कारवाई का होत नाही, असे प्रश्‍न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version