बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे आणि नाल्यांचे पाणी कालव्यात मिसळल्याने पाण्याचा दाब वाढला यामुळे लिमटेकजवळील नीरा डावा कालव्यात भगदाड पडले आहे.

पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्यातील वहनक्षमता अचानक वाढल्याने ही घटना घडली. मान्सूनपूर्व पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास अडचणी निर्माण झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर एन डी आर एफ चे दोन पथकं बारामतीच्या रवाना झाले आहेत. सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असून रात्रीची स्थिती पाहून पथकांना तिथून काढले जाईल अशी माहिती एन डी आर एफ चे असिस्टंट कमांडंट यांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version