इंदापूर : इंदापूर शहरातील डॉ. भाग्यश्री चव्हाण हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर यश मिळवत शहरातील पहिली महिला एम. एस. सर्जन होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

भाग्यश्रीने नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील एम. एस. सी. पदवी मिळवली. ती शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर या केंद्राचे प्रमुख व सेवानिवृत्त शिक्षक महादेव चव्हाण व शिक्षिका वैशाली चव्हाण यांची कन्या आहे.

भाग्यश्रीने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ मध्ये पहिली ते चौथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये पाचवी ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथील एच. चाटे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे तिने विज्ञान शाखेमधून अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर नीटची तयारी करीत गुणवत्ता रँकमधून कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर निगडी पुणे येथे बीएएमएस प्रथम श्रेणीत पूर्ण केले.

पीजी सीईटीची परीक्षा देऊन रँकमधून प्रवेश मिळवत पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण आश्विन रूरल आयुर्वेद महाविद्यालय मांचीहिल (ता. संगमनेर) येथे तीन वर्षाचे शिक्षण घेऊन एम. एस. सर्जन ही पदवी चांगल्या गुणांनी संपादित केली. तिच्या या यशाबद्दल तिचे तसेच तिचे पालक महादेव चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इंटर्नशिपमध्येच कोविड योद्धा म्हणून सन्मान

भाग्यश्रीने बीएएमएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप सुरू असताना कोरोनाची महामारी आली होती. या वेळी ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ येथे तिने ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करून अनेकांचे जीव वाचवले. तिने केलेल्या कार्याची दखल घेत रुग्णालयाच्या वतीने ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले होते.

माझ्या वडिलांनी अत्यंत गरिबीतून शिक्षण घेतले. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी सत्शील वृत्तीने अनेक विद्यार्थ्यांना घडवले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याचा माझा मानस आहे.

डॉ. भाग्यश्री चव्हाण

Share.
Leave A Reply

Exit mobile version