|| प्रतिनिधी – अमोल बेडके ||
पिंपरी-चिंचवड : दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी यमुनानगर, निगडी येथील मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात खुल्या राज्यस्तरीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत राज्यातील सात जिल्ह्यांमधून २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ५० खेळाडूंनी विविध प्रकारात आपले कौशल्य दाखवत पदके जिंकली. लाठी लढत, लाठी फिरविणे, सुराला फिरविणे, तलवार चालवणे, भाला फिरविणे अशा पारंपरिक प्रकारांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत मुंबई उपनगर संघाने प्रथम क्रमांक पटकावत अजिंक्यपद मिळवले. द्वितीय क्रमांक जालना जिल्ह्याने तर तृतीय क्रमांक सातारा जिल्ह्याने मिळवला.
स्पर्धेप्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे आणि खजिनदार स्मिता धिवार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे यशस्वी आयोजन रविराज चखाले, केतन नवले, गणेश चखाले आणि सुदर्शन सूर्यवंशी यांनी केले. पंच कमिटीमध्ये श्रेया दंडे, यश बालगुडे, स्नेहल मर्दाने आणि वर्तिका पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.
या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे पारंपरिक शौर्यक्रीडा प्रकारांना नवे प्रोत्साहन मिळाले असून, युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे.
