कल्याण : डीसीपी स्कॉडने आंबिवलीतील कुप्रसिद्ध इराणी वस्तीमध्ये धडक कारवाई करत ‘लेडी डॉन’ फिजा इराणीला अटक केली आहे. लेडी डॉनकडून पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ लाख १६ हजार रुपये किमतीचे एम.डी. ड्रग्ज जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिजा इराणी ही आंबिवली परिसरातील रहिवासी असून तिच्यावर यापूर्वीही ड्रग्ज तस्करीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवली जात आहे. ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणांमध्येही वाढ झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘लेडी डॉन’ फिजा इराणी विरोधात कारवाई केली आहे. डीसीपी स्कॉडला आंबिवली परिसरात एम.डी. ड्रग्जची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी अटाळी भागात सापळा रचला. यावेळी एका स्कूटीवर थांबलेल्या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची झडती घेतली. झडतीदरम्यान तिच्याकडे १.१६ लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्ज सापडले.

तत्काळ तिला ताब्यात घेत पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत तिची ओळख फिजा फिजा इराणी अशी पटली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्याविरुद्ध खडकपाडा आणि कोळशेवाडी पोलीस ठाण्यांमध्ये आधीपासूनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version