|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातील प्राचीन आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र धनेश्वर महादेव मंदिरात वर्षानुवर्षांची परंपरा जपत सोमवारी (ता. २८) वैशाख शुद्ध प्रतिपदेला पारंपरिक चंदनउटी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते ९ लघुरुद्र अभिषेक झाला. दुपारी ४ ते ६ श्रीराम व शारदा भजनी मंडळाच्यावतीने सेवा झाली. वैशाख महिन्यातील कडक उन्हाळ्यात थंडावा मिळावा या उद्देशाने महादेवासह इतर देवी देवतांसाठी औषधी गुणधर्म असलेल्या गुलाबपाणी, मुलतानी माती, अत्तर आणि ढोल कापूर मिसळून शुद्ध चंदन उगाळले जाते.
या चंदनउटीचा पारंपरिक पद्धतीने लेप दिला जातो. त्यानुसार या घट्ट गंधाचे उटी स्वरूपात महादेवाच्या पिंडीवर व देवतांच्या मूर्तीवर भक्तिभावाने लेपण करण्यात आले. त्यानंतर नित्य महाआरती झाली. यावेळी उपस्थित भाविकांच्या कपाळीही थंडगार चंदन लावण्यात आले.
या चंदनउटी सोहळ्यात पिंपरी चिंचवड शहरासह बाहेरगावाहून आलेल्या शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. सायंकाळी पंचक्रोशीतील एकतारी व इतर भजनी मंडळे मंदिरात दाखल झाली. अखंड भजनसेवेने वातावरण भक्तिमय झाले. सुश्राव्य भजन संध्या हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. त्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाल्याचे दिसून आला. संपूर्ण कार्यक्रमाची धनेश्वर विश्वास मंडळ, घनेश्वर गोशाळा ट्रस्ट, चिंचवड ग्रामस्थ व भक्त सेवेकऱ्यांनी उत्कृष्ट व्यवस्था केली.
