बीड : सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात मोठा राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेले वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वाल्मीक कराड आणि संतोष घुले सकाळी साडेनऊच्या आसपास नाष्टा करायला बरेकमधून बाहेर पडले होते, यावेळी जुनी दुश्मनी उफाळून आली. गीत्ते गँगचा सदस्य महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे संकेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील दिले आहेत.
वाल्मिकवरील हल्ल्यानंतर आता गीत्ते गँगचा म्होरक्या शशिकांत उर्फ बबन गीत्तेनं फेसबूक पोस्ट करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुरुंगात एखाद्याला मारणं किंवा स्वत: मरणं, सगळं काही माफ आहे, अशा आशयाची धमकी बबन गीत्ते यानं दिली आहे. त्याने फेसबूकवर आपला एक फोटो अपलोड केला आहे. त्यात त्याने ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’ असं म्हटलं आहे.
बबन गीत्ते याच्या पोस्टनंतर आता बीडमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बबन गीते हा सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. तो मागील अनेक महिन्यांपासून फरार आहे. त्याचे वाल्मीक कराडसोबत जुनं वैर असून वाल्मीक कराडनेच आपल्याला बापू आंधळे खून प्रकरणात अडकल्याचा आरोप आहे. आता वाल्मीकवर तुरुंगात हल्ला करणारे महादेव गीत्ते आणि अक्षय आठवले हे दोघंही बबन गीत्ते गँगचे सदस्य असल्याची माहिती आहे. अशाप्रकारे तुरुंगात वाल्मीकवर हल्ला होणं आणि त्यानंतर फरार असलेल्या बबन गीत्ते याच्याकडून फेसबूकवर पोस्ट करत धमकी देणं, यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
तुरुंगात नक्की काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, बीड कारागृहात तुरुंग प्रशासनाकडून दररोज सकाळी साडे नऊच्या सुमारास कैद्यांना नाष्टा दिला जातो. सोमवारी सकाळी देखील नेहमीप्रमाणे नाष्ट्याची वेळ झाली होती. त्यामुळे सर्व कैदी नाष्टा करण्यासाठी एकत्रित गोळा झाले होते. यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले देखील नाष्टा करायला बरेकमधून बाहेर पडले होते. यावेळी याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्यांवरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.”
सूत्रांच्या माहितीनुसार, मागील चार ते पाच दिवसांपासून महादेव गित्ते आणि वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात तणाव सुरू होता. त्यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमक सुरू होती. याची कल्पना तुरुंग प्रशासनाला आल्याने कारागृहात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता. मात्र आज सकाळी नाष्ट्याच्या वेळी दोन गट आपसात भिडले. अक्षय आठवले आणि महादेव गित्ते हे दोघेही वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेवर धावून गेले. यावेळी गिते गँगने वाल्मीक कराडला तीन ते चार चापटी मारल्याची माहिती आहे. तर सुदर्शन घुलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जातंय. कुणावर कुणी हल्ला केला, याची अद्याप अधिकृत माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
