नाशिक : पुर्ववैमन्यास आणि परिसरात वर्चस्व राहण्यासाठी पाच हल्लेखोरांनी दोन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृणपणे खून केल्याने रंगपंचमीला गालबोट लागला. ही घटना बुधवारी (दि.१९) रात्री 9.30 वाजेदरम्यान नाशिक-पुणे रोडवरील बोधले नगर परिसरात असलेल्या आंबेडकरवाडी परिसरात घडली.

मृत उमेश जाधव हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नाशिक शहर उपाध्यक्ष आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून, पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

उमेश उर्फ मन्ना जाधव (वय ३२) व भाऊ प्रशांत जाधव (वय ३०) अशी मयत झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. सागर गरड (सर्व जण रा. आंबेडकर वाडी, नाशिक रोड नाशिक), अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश उर्फ सोनू उशिरे अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.19) रात्री 9.30 वाजेदरम्यान मयत उमेश व प्रशांत जाधव हे भाऊ व नितीन हटकर, मयूर भोये, आदित्य, विनोद पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासाठी चर्चा करत होते. त्यावेळी उमेश जाधव यास त्याच्या आईने कॉल करुन घरी बोलावले. त्यानुसार तो घरी जात असताना काही अंतरावर आरडाओरडा सुरु झाला. टोळक्याने उमेशला तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. त्यावेळी भावाचा जीव वाचविण्यासाठी प्रशांत धावून गेला. हल्लेखोरांनी प्रशांतवरही प्राणघातक हल्ला केला. त्यात ते दोघेही गंभीर जखमी होऊन खाली पडल्यावर हल्लेखोरांनी दुचाकीवरुन पळून काढला. जाधव बंधूंच्या मित्रांनी दोघांनी उपचारार्थ तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी आले. जिल्हा रुग्णालयात जाधव कुटुंबिय व नातेवाईक आणि नागरिकांनी संशयितांना अटक करण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशिरा पोलिसांनी संशयित सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश ऊर्फ सोनू उशिरे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हल्लेखोरांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, प्राणघातक हल्ले आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, नाशिक शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे बोलले जात आहे. जानेवारी ते २० मार्च २०२५ अखेर १३ खूनाच्या घटना घडल्या असून, १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version