मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला. औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे हा संघर्ष उफाळला असल्याचे सांगितले जात आहे.

या संघर्षात दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली, तसेच काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. नागपूर पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत या भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.

नागपूरच्या घटनेवर सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया

या घटनेनंतर राज्यभरात विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विविध नेतेमंडळींनी या घटनेचा निषेध करत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत. गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने आपल्या पोस्टद्वारे या हिंसाचारावर भाष्य करत नागरिकांना संयम पाळण्याचा संदेश दिला आहे. त्याने लिहिले, “दंगल करू नका मित्रांनो, तुमच्या नावावर फक्त केसेस असतील.” त्याच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सामान्य नागरिकांच्या भावना आणि संतप्त प्रतिक्रिया

उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. एका युजरने लिहिले, “नेते मंडळींची मुलं विदेशात शिकतात आणि सामान्य माणसांची मुलं दंगलीच्या केसेसमध्ये अडकतात.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिले, “ज्या दिवशी तरुणांना हे कळेल, तेव्हाच परिस्थिती बदलेल.”

दरम्यान, अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही नागपूरकरांना संयम राखण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हेमंतने Xवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलंय, “नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती! कृपया शांतता आणि सलोखा जपा!”

त्याने पुढे लिहिलंय, “ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा! ते बरळतील, आपण विचार सांगायचा! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा! #जय_महाराष्ट्र”

Share.
Leave A Reply

Exit mobile version