पंढरपूर : बीड आणि लातूरनंतर आता माळशिरसमध्येही तरुणाची विवस्त्र करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला गरम सळीचे चटके देऊन त्याची हत्या करण्यात आली.

याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार प्रेम संबंध किंवा अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तरुणाच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. माळशिरस तालुक्यात पिलीव येथे आकाश अंकुश खुर्द पाटील या 28 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. माळशिरस-पिलीव रोडवर पिलीव हद्दीमध्ये असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये आकाश याचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेमध्ये आढळून आला.

गरम सळईचे चटके

आकाशच्या शरिरावर अनेक गंभीर जखमा होत्या, गरम लोखंडी सळईने त्याच्या शरिराला चटके देण्यात आले होते. तसंच त्याच्या तोंडातूनही रक्त येत होतं. आकाशच्या मृतदेहाशेजारीच त्याची मोटरसायकलही आढळून आली. या हत्याकांडाने पिलीवसह माळशिरसमध्ये एकच खळबळ माजली आहे.

हत्येची माहिती मिळताच पिलीव आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी लागलीच घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पोलिसांनी आकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आकाशची हत्या प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबधातून झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक तरुणी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. बीड, लातूर आणि परभणीनंतर आता क्रुर हत्येचा प्रकार सोलापूरमधूनही समोर आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version