बीड : शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हते,असा जावईशोध राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे मंत्री नितेश राणेंनी लावाला आहे. तर औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच चांगलाच कार्यक्रम होणार असल्याचा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. ज्यानंतर स्वपक्षीयांपासून ते विरोधकांनी राणेंवर चढाई केल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुती सरकारचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेल्या दाव्यानंतर वाकयुद्ध सुरू झाले आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाची जाती-धर्मात भेदभाव केल्याचा कुठलाच पुरावा इतिहासात सापडत नाही. पण, असं असतानाही राज्याचे मंत्री असलेल्या नितेश राणेंनी एक भलताच शोध लावलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हतेच असा दावा राणेंनी केलाय.
नितेश राणे म्हणाले, संभाजीराजे नसते तर आपल्या आडनावाच्या पुढे वेगळच नाव लागलं असतं. औरंगजेबाला थांबविण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुसलमान नव्हते. हिंदू- विरुद्ध मुसलमान अशीच लढाई होती . काही अतिशहाणे सांगतात कधी महाराजांनी मस्जिद तोडली नाही. ज्यांनी ज्यांनी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना महाराजांनी धडा शिकवला. आज कडवट हिंदूत्ववादी सरकार राज्यात आहे
राणेंच्या वक्तव्यानं खळबळ
नितेश राणे बोलणार आणि त्यावरुन वाद नाही होणार? असं शक्य तो होत नाही. अपेक्षेप्रमाणे राणेंच्या या वक्तव्यानं खळबळ माजलीच. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राणेंच्या या विधानाचा समाचार घेतला. संजय राऊत यांनी राणे डबक्यात असल्याचा हल्ला चढवला, तर आव्हाडांनी त्यांच्या अज्ञानावर प्रहार केला.
उपमुख्यमंत्र्यांनीही राणेंचा दाव्याची हवा काढली
आतापर्यंतच्या इतिहासात ज्या गोष्टीचा उल्लेखच नाही, असा छातीठोक दावा राणेंनी केला. त्यामुळं प्रचंड संभ्रम निर्माण झाला. शिवरायांचे वंशज असणारे आणि भाजपचे खासदार असलेल्या उदयनराजेंना पुढे येऊन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता सांगावी लागली. त्याचवेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीही राणेंचा दाव्याची हवा काढावी लागली.
राजकारणासाठी नेते काय बोलतील याचा नेम नाही.. पण, आपल्या वक्तव्यातून इतिहास खोडण्याचे प्रयत्न होवू नये, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. मंत्रिपदावर असणाऱ्यांनी घ्यायलाच हवी आणि जेव्हा हा इतिहास महाराष्ट्राच्या आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे, तेव्हा तर प्रत्येकानंच जपूनच बोलायला हवं. पण, सध्याच्या राजकीय गोंधळात मंत्रीही सर्रासपणे या अलिखित आचारसंहितेचा भंग करतायेत.. त्यामुळं आता वरिष्ठांनीच यात लक्ष घालण्याची गरज आहे..
