|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||
पुणे : विवाहास नकार दिल्याने तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात नुकतीच घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणीविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गणेश राजू सिंग (३०, रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरहीन इफ्तेखार अन्सारी (२६, रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंग याची बहीण गौरी राजेंद्र कांबळे (३३, रा. इंदिरानगर, ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्याची आई वैदूवाडी भागात राहायला आहेत. त्याची आई मगरपट्टा भागात घरकाम करून उदरनिर्वाह करते. गणेश हा शेवाळवाडीतील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्यावर पाण्याच्या बाटल्यांची विक्री करायचा. त्याच्या घराशेजारी फरहीन राहायला आहे. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांनी कुटुंबीयांना विवाह करणार असल्याचे सांगितले होते.
ती नेहमी गणेशकडून कपडे खरेदीसाठी पैसे घ्यायची. फरहीन घरातील किराणा माल भरण्यासाठीदेखील त्याच्याकडून पैसे घ्यायची. फरहीन एका व्यायामशाळेत कामाला होती. तिला सोडायला तो दररोज सकाळी जायचा. फरहीनने दुचाकी घेतली होती. दुचाकीचे हप्ते तो भरत होता. किरकोळ कारणावरून ती त्याला त्रास द्यायची. गणेशच्या मित्रांनी तिला समजावून सांगितले होते. काही दिवसांपासून तिने गणेशसोबत बोलणे सोडले होते. गणेशला तिने झिडकारले होते. तेव्हापासून गणेश नैराश्यात होता. ७ फेब्रुवारी रोजी गणेश घरी रडत होता. फरहीनमुळे मी कर्जबाजारी झाल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले, असे गणेशची विवाहित बहीण गौरी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर गणेश घरातून निघून गेला. तो बेपत्ता झाल्याची तक्रार वानवडी पोलिसांकडे देण्यात आली होती. गणेशने हडपसर भागात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर त्याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गणेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करत आहेत.
