|| प्रतिनिधी :ज्योतिराम कांबळे ||
पंढरपूर : भगवान विष्णुच्या कृष्ण अवतारानंतर ते पंढरीतील चंद्रभागेच्या तीरावर भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठलाच्या रुपात विराजमान झाले. ते रुसलेल्या रूक्मिणी मातेच्या शोधार्थ पंढरीत आले होते. तत्पूर्वी
गायी गोपाळांसह गोपाळपुरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रातील विष्णुपद येथे त्यांनी विश्रांती घेतली व याठिकाणी गोपाळांसह गोपाळकाला केल्याची आख्यायिका आहे.
यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात फिरताना त्यांना भक्त पुंडलिक दिसले आणि नंतर ते कर कटावर ठेवून विटेवर उभे राहिले. अठ्ठावीस युगांपासून पांडुरंग याठिकाणी उभे आहेत. याचे वर्णन विठ्ठलाच्या आरतीमध्ये सुध्दा आहे.
यावेळी श्रीकृष्णाने अर्थात पा़डुरंगाने आपल्या सोबत आणलेल्या गायींचा वंश म्हणजेच गोवंश आजही चंद्रभागेच्या वाळवंटात आढळून येतो. अशा दीड दोनशे गायी गुरांचा वावर सध्या याठिकाणी आहे. परंतु याकडं श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती चं लक्ष जात नाही. जर या गायी गुरांना मंदिर समितीच्या गोशाळेत नेऊन येथे त्यांचा सांभाळ केला तर पांडुरंगाच्या सोबत आलेला हा गोवंश अस्तित्वात राहील अन्यथा यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. याचबरोबर रात्री अपरात्री या गायींच्या व सोबतच्या बैल, वळू यांच्या टक्करीही वाळवंटात होतात त्यामुळे वाळवंटात झोपलेल्या भाविकांनाही इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी धक्कादायक माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
ही गाय गुरं चंद्रभागेच्या पात्रात विखुरलेला कचरा खातात, ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्यांचा समावेश असतो. हे प्लास्टिक पोटात गेल्याने या गायी गुरांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. त्यामुळे मंदिर समिती ने याकडे लक्ष द्यावे. तब्बल ६५ लाख ७० हजारांचं टेंडर मंदिर समितीच्या गोशाळेतील हिरव्या चा-यासाठीचे टेंडर निघते,
पशुखाद्य, हिरवा चारा, सुखा चारा असे तीन वेगवेगळ्या टेंडरसाठी मंदिर समिती वर्षाकाठी सरासरी दोन अडीच कोटी रूपये खर्च करते. याच गोशाळेत पांडुरंगाने सोबत आणलेल्या या गोवंशाचा सा़ंभाळ मंदिर समितीने करावा. अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. अन्यथा आम्ही स्वतः च या गायी गुरांना मंदिर समिती च्या गोशाळेत आणुन सोडु. असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
