|| प्रतिनिधी : छाया खंदारे ||

भोसरी : औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात रोजगाराच्या शोधात येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक युवक-युवती फसवणुकीचे बळी ठरत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी व चाकण येथे सुरू करण्यात आले आहे.

भोसरी येथील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी महापौर लांडगे यांच्या हस्ते झाले. या वेळी विविध मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत माहिती देताना महापौर लांडगे म्हणाले, की आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या होतकरू युवकांसाठी हे केंद्र संपूर्णतः विनामूल्य सेवा देणार आहे. नोकरी मिळवताना एजंटमार्फत होणारी आर्थिक फसवणूक रोखणे आणि युवकांना योग्य दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नोंदणीपासून ते नोकरी मिळेपर्यंत तसेच राहण्याच्या सुविधेबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन या सर्व सेवा येथे मोफत उपलब्ध असतील.

दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक परिसरातील फुगे प्रायमा इमारतीत तसेच चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली.

“तरुणांना केवळ रोजगार नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे,” असेही लांडगे यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version