चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी, शिवाजी पार्क परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामस्थळी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तुकाराम शिंदे यांच्या मालकीच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान दोन कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तात्काळ अटक केली असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, ही घटना केवळ कामगारांमधील वाद नसून अनधिकृत बांधकामांना मिळणाऱ्या संरक्षणामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे.

सदर प्रकरणात बिल्डिंग मालक तुकाराम शिंदे, संबंधित ठेकेदार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर आणि प्रभाग क्र 16 चे बीट मार्शल सुहास भगत यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळेच अशा बेकायदेशीर बांधकामांना चालना मिळाल्याचा आरोप आहे. या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप कामगाराला जीव गमवावा लागला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी,संघटक सुनील जावळे यांनी या प्रकरणात सर्व संबंधितांना सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकारी राजाराम सरगर आणि सुहास भगत यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यासोबतच संबंधित अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे आणि शहरातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे
दरम्यान, या सर्व मागण्यांसंदर्भात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.