|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे ||
तळेगाव दाभाडे (पुणे) : येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा मुख्य रोप (लोखंडी दोरी) तुटून झालेल्या भीषण अपघातात 25 ते 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवत तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि इतर 11 कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाची ओळख दिनेश सुरंगे अशी झाली असून, ते कामानिमित्त लिफ्टने खाली जात असताना ही दुर्घटना घडली. सहाव्या आणि सातव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकली होती. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच लिफ्टचा मुख्य रोप तुटल्याने लिफ्ट सातव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळली.

या अपघातात दिनेश सुरंगे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मयत दिनेश यांच्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोसायटीकडून लिफ्टच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन व इतर 11 सदस्यांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.