पुणे : राज्यातील गड-किल्ल्यांवर दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देत असतात. दुर्गम डोंगररांगा, कडे-कपारी आणि कठीण चढाईमुळे अनेकदा अपघातांच्या घटना घडतात. अशा वेळी जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचविणारे आपत्ती व्यवस्थापनातील स्वयंसेवक, मावळे आणि स्थानिक कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. या धाडसी कार्यकर्त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड येथे आयोजित कार्यक्रमात गड-किल्ल्यांवरील आपत्कालीन बचाव कार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या विविध संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम (जुन्नर), हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम तसेच राजगड पुरातत्त्व विभागातील बापू साबळे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे, किल्ले विसापूर येथील रोहित नगीने, राहुल वाघमारे, अनिकेत आंबेकर, सागर कुंभार, नितीन विधाटे (वन परिमंडळ जुन्नर), देविदास मिसाळ (वनरक्षक, शिवनेरी), कैलास झरांडे व स्वप्नील सांबरे (सिंहगड वन समिती), हरिदास वऱ्हाड (पाटबंधारे विभाग, खडकवासला धरण) आणि दीपक घोरपडे यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात सिंहगड, राजगड, तोरणा आणि शिवनेरी या किल्ल्यांवर अपघातग्रस्तांना तातडीची मदत अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड आणि श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान यांच्या वतीने चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’ प्रदान करण्यात आली.

या स्ट्रेचरच्या साहाय्याने अपघातग्रस्त व्यक्ती अथवा मृतदेह दरी, खोल खळगे, कडे-कपारी किंवा कड्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढणे सुलभ होते. तसेच आवश्यकतेनुसार स्ट्रेचरवरून अपघातग्रस्तांना हेलिकॉप्टरद्वारे एअर लिफ्ट करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे गड-किल्ल्यांवरील बचाव कार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे करता येणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, रोटरी क्लब सिंहगड रोडचे अध्यक्ष अमेय पासलकर, सचिव प्रियांका लागू, इंद्रजितसिंह हिंदुराव घोरपडे गजेंद्रगडकर, सतीश खाडे (डायरेक्टर) आणि दीपक घोरपडे उपस्थित होते. यावेळी विविध किल्ल्यांवरील बचाव पथकातील कार्यकर्ते तसेच रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी गड-किल्ले हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा ऐतिहासिक ठेवा असल्याचे सांगितले. या ठेव्याचे संरक्षण करताना आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या बचाव पथकांचे कार्य अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका देशपांडे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version