महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील बावली टोक येथे गुरुवारी (दि. १२) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास एका वॅग्नर कारचा भीषण अपघात होऊन वाहन तब्बल ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने धाडसी बचावकार्य करून सुटका केली.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांनी तातडीने टीमला कळवले. त्यानंतर अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने आवश्यक सुरक्षा साहित्य व रोपच्या सहाय्याने संपूर्ण सेटअप तयार करून दरीत उतरून बचावकार्य सुरू केले. सर्वप्रथम गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्ट्रेचर व रोपच्या साहाय्याने वर काढण्यात आले. त्यानंतर इतर जखमींनाही सुरक्षितरित्या वर आणण्यात पथकाला यश आले.
या बचावकार्यात प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामने व संकेत सावंत यांच्यासह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी व सोमनाथ वागदरे यांनी सहभाग घेतला. तसेच वाडा कुंभरोशी व चिरेखिंड येथील ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनीही मदत केली.
दरम्यान, दरीत कोसळलेल्या वाहनातील सर्व जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असून बचाव पथकाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
