|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे ||
चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रावेत बंधाऱ्यात सांडपाणी व मैला सोडण्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तात्काळ संयुक्त पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्याच्या परिसरात काही भागांतून बेकायदेशीर नाले जोडण्यात आले असून त्यामधून सांडपाणी थेट बंधाऱ्यात मिसळत आहे. परिणामी बंधाऱ्यातील पाणी दूषित होत असून याच पाण्यावर पुढील शुद्धीकरण प्रक्रिया करून शहरवासीयांना पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सांडपाणी व मैला मिसळल्यामुळे जलजन्य आजार, संसर्गजन्य रोग तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
या संदर्भात महापौर, स्थानिक नगरसेवक, विरोधी पक्षनेते, आमदार-खासदार तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रावेत बंधाऱ्याच्या परिसराची संयुक्त पाहणी करून वस्तुस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत नालाजोडणी त्वरित बंद करून जबाबदारांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात नमूद आहे.
शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या निवेदनानंतर महापालिका प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
