|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

पिंपरी-चिंचवड : वालेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घरगुती आगीची घटना घडली. सचिन रामदास जमदाडे यांच्या निवासस्थानी फ्रीजच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.

आगीची माहिती समजताच नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी लगेचच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांची विशेष टीम घटनास्थळी बोलावून घेतली. या टीममार्फत आगीमुळे घरात साचलेला मलबा, जळालेले साहित्य व कचरा हटवून तात्काळ साफसफाई करण्यात आली.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेळीच मदतकार्यामुळे आणि नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांच्या हस्तक्षेपामुळे नुकसानग्रस्त जमदाडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. या कठीण प्रसंगी झालेल्या मदतीबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आगीच्या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने व तत्काळ मदतकार्य सुरू झाल्याने परिस्थिती सामान्य झाली. नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणे व वायरिंगची नियमित तपासणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version