|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी-चिंचवड :  प्रभाग क्रमांक १७ मधील निवडणूक यंदा केवळ राजकीय लढत न राहता, उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर केंद्रित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शुभम दिलीप वाल्हेकर हे या प्रभागातून निवडणूक लढवत असून, यापूर्वी अनेक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कार्यरत असतानाही ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या उमेदवाराला डावलून आयात उमेदवाराला तिकीट देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाचा थेट फटका निवडणुकीत बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शुभम वाल्हेकर यांच्याकडे जनतेचा कल वाढताना दिसत आहे. यामागे त्यांच्या कुटुंबाची दीर्घकाळाची सामाजिक आणि राजकीय परंपरा महत्त्वाची ठरत आहे. शुभम वाल्हेकर यांचे चुलते भगवान (आप्पा) धर्माजी वाल्हेकर यांनी राजकारणाकडे सत्तेच्या माध्यमातून नव्हे, तर माणुसकीच्या सेवाभावातून पाहिले. शिवसेनेत शहरप्रमुख ते उपजिल्हाप्रमुख अशा जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ‘सत्तेपेक्षा जनता मोठी आणि वचनापेक्षा कर्म मोठे’ हे तत्व कायम जपले.

परिसरातील नागरिकांसाठी साडेबारा टक्के परतावा मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच प्राधिकरण बाधित नागरिकांची घरे वाचवण्यासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. या कामांची आठवण आजही नागरिकांमध्ये आहे.

याच पार्श्वभूमीवर, विकास आणि कामावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचा पाठिंबा शुभम वाल्हेकर यांना मिळत असल्याचे चित्र आहे. तरुण वर्गाची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार असून, उमेदवारी डावलल्याचा मुद्दा आणि पारंपरिक कामाची शिदोरी यामुळे प्रभाग १७ मधील लढत अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version