|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे ||

पिंपरी-चिंचवड : अवैध शस्त्रधारकांवर धडक कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 01 ने काळेवाडी परिसरात एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन राबवून देशी बनावटीचे कट्टा व जिवंत राऊंड बाळगणाऱ्या युवकाला रंगेहाथ पकडले आहे. महापालिका व पोलिस आयुक्तालय हद्दीतील सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या शस्त्रप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत मोलाची ठरत आहे.

घटनेनुसार, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पथक नियमित पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, पोलीस हवालदार सागर अवसरे व पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांना त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, रोहित महादेव आगरखेड (वय 22, रा. पवनानगर, काळेवाडी) हा इसम अवैधरित्या शस्त्र बाळगून परिसरात फिरत आहे.

मिळालेल्या माहितीस त्वरित प्रतिसाद देत गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी परिसरात सापळा रचला व संशयिताच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. आरोपीस ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे 01 पिस्टल व 01 जिवंत राऊंड असा एकूण ₹50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. संपूर्ण प्रक्रिया पंचासमक्ष आणि नियमांनुसार पंचनाम्याद्वारे पूर्ण करण्यात आली.

अवैध शस्त्र बाळगणे हा गंभीर प्रकार असल्याने आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या घटकांवर प्रतिबंध बसणार असून, गुन्हे शाखा युनिट 01 च्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

सदर ऑपरेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली — सपोनि दत्तात्रय गुळीग, पोउपनिरीक्षक कर्मराज गावडे, पो. हवा. जयवंत राऊत, पो. हवा. सागर अवसरे, पो. शि. लक्ष्मीकांत पतंगे, पो. शि. तेजस भालचिम, पो. शि. विजय जानराव या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version