|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
“फुलांसारखी कोवळी लेकरं,
हास्यांनी भरतील जग सारं…
बालदिनाची आली चाहूल,
मुलांच्या आनंदाने खुलला सारा माहोल” !
पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या श्री गुरु गणेश बालक मंदिर व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे गुरुवारी बालदिन उत्साह, आनंद आणि खेळांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात सकाळपासूनच मुलांच्या किलबिलाटाने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री. राजेन्द्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि चेअरमन, शालेय शिक्षण समिती मा. प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक बालदिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाला शुभारंभ केला.
विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली खाऊगल्ली हा कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरला. पाणीपुरी, भजी, पॉपकॉर्न, दाबेली यांसारख्या खाद्यपदार्थांचा मुलांनी आवडीने आस्वाद घेतला. तसेच trampoline, नेमबाजी, डान्सिंग कॉर्नर अशा विविध खेळांनी लहानग्यांचा आनंद अधिकच वाढवला.
बालदिनाचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. खेळ, खाऊ आणि हशांनी भरलेल्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला. पालक आणि शिक्षकांनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
