|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

चिंचवड  : पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेतल्यामुळे पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असे संशयित पत्निचे नाव आहे. ही घटना आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली. चारित्र्यावरून झालेल्या वादातून संतापाच्या भरात पत्नीने नकुलचा गळा कापडाने आवळून खून केला.

या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत — एक पाच वर्षांचे व दुसरे दोन वर्षांचे. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चैताली भोईर हिला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

मृत नकुल भोईर हा सामाजिक कार्यात सक्रिय होता. मराठा क्रांती मोर्चा तसेच इतर सामाजिक संघटनांच्या उपक्रमांमध्ये तो जिकिरीने सहभाग घेत असे. त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याने पत्नीला आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत उभे करण्याचा मानस व्यक्त केला होता.

या घटनेने सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version