|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड आणि सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर दिवाळीच्या रंगांनी आणि आनंदाने उजळून निघाला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ॲड. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी व शालेय शिक्षण समितीचे चेअरमन मा. प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया, तसेच मा. श्री. आनंदरामजी उत्तमचंदाजी धोका, कार्यकारिणी सदस्य, हे मान्यवर अतिथी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दिवाळीच्या पारंपरिक सणांविषयी — वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज — या सणांचे महत्त्व आणि परंपरा यांची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दलची जाण अधिक दृढ झाली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शिक्षक व विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘तोरणा किल्ला’. या किल्ल्याद्वारे ऐतिहासिक वारसा आणि सणांच्या परंपरा यांचा सुंदर संगम सादर करण्यात आला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका सौ. लता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षकवृंद व पालक वर्गानेही उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण शाळा परिसर आनंद, रंगोली आणि दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाला होता.
