|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद आणि शहर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५” ला पंढरपूरकर नागरिक, महिला भगिनी, गणेश मंडळे व सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की, या स्पर्धेत तब्बल 116 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने सजावट करणे, टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पना राबविणे तसेच प्लास्टिक-थर्माकोलमुक्त सजावट या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
स्पर्धकांनी आपल्या कलात्मकतेतून विविध पारंपरिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले. यामध्ये माधुरी हत्तीणीची कथा, मराठी सण व परंपरा जपा हा संदेश, पांडुरंग भक्त गोरा कुंभाराचा देखावा, श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रमुख चार यात्रा, हरिश्चंद्रगडवरील केदारेश्वर मंदिर, जेजुरीचे खंडोबा मंदिर तसेच ग्रामीण संस्कृतीचे पारंपरिक वाडे आदी आकर्षक व भावनिक देखावे साकारले गेले.
स्पर्धेचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ञ परीक्षकांची पाच पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी घरोघरी भेट देऊन पर्यावरणपूरकता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे, तसेच सामाजिक संदेश या निकषांवर आधारित गुणांकन केले.
या उपक्रमासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे, प्रशासकीय अधिकारी श्री. बोडरे व पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असून विजेत्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.
