पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : क्षितिजा देव ): गणेशोत्सवानंतर गौरीचे मंगल आगमन झाले. घराघरांत देवीचे आगमन होऊन वातावरण भक्तिभावाने उजळते, तसेच निसर्गालाही आपली देवी-देवता मानून जपले पाहिजे, या संदेशाने स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान आणि अंघोळीची गोळी संस्था यांच्या वतीने ‘खिळेमुक्त झाडं’ हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे महिलांनी एकत्र येऊन झाडांवर ठोकलेले खिळे व स्टेपलर पिन काढल्या. एकूण २० झाडांना खिळेमुक्त करून तब्बल ५० पेक्षा अधिक खिळे व पिना काढण्यात आल्या. झाडांची साफसफाई करून महिलांनी त्यांच्या पायाशी नैवेद्य ठेवला, पूजा केली आणि आरतीही म्हटली. त्यामुळे परिसर भक्तिभाव, श्रद्धा आणि निसर्गप्रेमाने उजळून निघाला.
संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जगताप म्हणाल्या, “झाडांनाही जीव असतो. आपण दररोज तुळशीला पाणी घालतो तसेच झाडांचीही पूजा केली पाहिजे. झाडांना खिळे ठोकणे म्हणजे त्यांच्या जिवाला इजा करणे होय. आपण त्यांच्यावर जाहिरातींचे बोर्ड लावतो, पिन ठोकतो पण यामुळे झाडे हळूहळू कोमेजतात. म्हणूनच या सणाच्या निमित्ताने झाडांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये झाडांबद्दल संवेदनशीलता निर्माण झाली. महिलांनी गौरीप्रमाणेच झाडांनाही आईचे स्वरूप देत त्यांची आरती केली. “गौरीचे आगमन झाले की घर आशीर्वादाने भरते, तसेच झाडांचेही आपल्या जीवनात आगमन झाले तरच हवा, पाणी व सावली यांचे वरदान आपल्याला लाभेल,” असा संदेश महिलांनी दिला.
या उपक्रमात उर्मिला चवरे, अनिता धाक्रस, जयश्री वीरकर, कमल टोणगे, अजित जाधव तसेच अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे उपक्रमाला धार्मिक आणि पर्यावरणपूरक असे आगळे-वेगळे स्वरूप लाभले.
