|| प्रतिनिधी : प्रशांत बिट्टुरवार ||
चंद्रपूर : गणेश चतुर्थीच्या पावन दिनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यंदा या घरातील गणेशोत्सवाला तब्बल ९५ वर्षे पूर्ण होत असून, १९३० पासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने जोपासली जात आहे.
जोरगेवार कुटुंबाची ही धार्मिक परंपरा आता चौथ्या पिढीकडे पोहोचली आहे. सकाळच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शास्त्रोक्त विधी-विधानानुसार झालेल्या पूजा-अर्चा आणि आरतीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, अशी प्रार्थना केली. तसेच सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची भरभराट होवो, अशी मंगलकामना त्यांनी व्यक्त केली.
