पिंपरी चिंचवड : (प्रतिनिधी : शुभम जाधव ) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने धाडसी कारवाई करत २४ गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार गणेश उर्फे “मॅड गण्या” कांबळे (वय २४, रा. भाटनगर, पिंपरी) याला जेरबंद केले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व धारदार शिकारी चाकू जप्त करण्यात आले.
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व पोलिस हवालदार देवा राऊत यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक सराईत गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून निराधारनगर परिसरात फिरत आहे. माहिती खात्रीशीर असल्याचे दिसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले.
निराधारनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचला असता, आरोपी गणेश उर्फे मॅड गण्या कांबळे पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि शिकारी चाकू मिळून आले.
गणेश उर्फे मॅड गण्या कांबळे हा गुन्हेगारी जगतातील कुख्यात चेहरा असून त्याच्यावर खून, चैनचोरी, जबरीचोरी, मोक्का असे तब्बल २४ गुन्हे नोंदवलेले आहेत. याशिवाय तो पिंपरी पोलिस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी आहे.
विशेष म्हणजे, परिमंडळ-१ चे पोलिस उपआयुक्त यांच्या आदेशान्वये त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियमाखाली दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, आदेशाचा भंग करून तो पुन्हा शहरात दाखल झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त श्री. सारंग आवाड, सह पोलिस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, दिलीप चौधरी, देवा राऊत, जयवंत राऊत, उषा दळे, विजय शेळकंदे, उद्धव खेडकर, केशव चेपटे, अविनाश कांबळे व तेजस भालचिम यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली.
