गडचिरोली चामोर्शी : तालुक्यातील रेगडी गावात रविवारी दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेले रामा गोटा (रा. रेगडी) यांचा दुर्दैवीरीत्या तलावात बुडून मृत्यू झाला. रामा गोटा हे त्यांच्या घरातील एकमेव कर्ता पुरुष होते. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रामा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे लक्षात येताच रेगडी येथील बजरंग दल शाखेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने मदतीचा हात पुढे केला. रामा गोटा यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी उचलत त्यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी कुटुंबाचे सांत्वन करून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली.
या उपक्रमात भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ शाहा, बजरंग दल शाखा रेगडीचे अध्यक्ष प्रशांत शाहा, मंत्री रवी दुधकोहर, विक्की शाहा, उमेश मल्लिक, आकाश कुळमेथे, देवराव खंडरे, अमित चक्रवर्ती, प्रशांत मोहर्ले, अजय मन्नो यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
गावातील नागरिकांनी बजरंग दलाच्या या संवेदनशील आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले असून, अशा प्रसंगात समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना मदत करण्याची भावना जोपासली पाहिजे, असे मत व्यक्त केले जात आहे.
