पंढरपूर (प्रतिनिधी ज्योतीराम कांबळे) : “आदिवासींच्या नोकऱ्या बोगस जातीच्या दाखल्यांनी बळकावल्या जात आहेत, निधी वळवला जातोय, विकासाची गंगा पाड्यापर्यंत पोहोचत नाही… हे अन्याय आता थांबलेच पाहिजेत” असा स्फोटक इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी खालापूर येथे दिला.

 

 

9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त खालापूर येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तालुक्यातील सर्व गावांतील हजारो आदिवासी बांधव व भगिनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले. सततच्या पावसात, चिखलात आणि बसण्याची सोय नसतानाही बांधव आठ तास ठामपणे उभे राहून ऐक्याचे दर्शन घडवत होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांतून बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांसारख्या महापुरुषांचे कार्य सादर झाले. उच्च शिक्षित आदिवासी मुलींनी प्रेरणादायी भाषणे करून समाजाला जागृत केले. गिते यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनावर तीव्र निशाणा साधत, आदिवासींच्या जागा बोगस प्रमाणपत्र धारकांनी व्यापल्याचा आरोप केला आणि अशा प्रकरणांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच, आदिवासी निधी अखर्चेत न ठेवता योग्य पद्धतीने वापरण्याचा कायदा करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

शासनाने 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा शासन निर्णय तात्काळ न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. “हिंदी दिन, मराठी दिन, रस्ता सुरक्षा अभियान अशा कार्यक्रमांना प्राधान्य मिळते, पण आदिवासींच्या राष्ट्रीय सणाकडे शासनाचा दुर्लक्ष होत आहे” अशी खंतही व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी खालापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आयोजकांनी पावसातही उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. या वेळी मालू निरागुडे, बी.पी. लांडगे, नारायण निरगुडा, रवी बांगरे, राम शिंगावा, राजू सुतक, काशिनाथ निरगुडा, अनंता वाघमारे, सचिन वाघमारे, पांडुरंग देहू पारधी, रामा निरगुडा, प्रदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version